पुणे : राज्यात आतापर्यंत २०७ साखर कारखान्यांनी ९७८ लाख टन ऊसाचे गाळप करून ९९ लाख टन साखर उत्पादन केले आहे. सद्यस्थितीत १०.१३ टक्के साखर उतारा आहे. कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यामुळे एकूण ३८ कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. दरम्यान, राज्याच्या ऊस गाळपाबाबत यापूर्वीचे अंदाज चुकले आहेत. आतापर्यंत अंदाजापेक्षाही जादा म्हणजेच ९७८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. अद्याप ५० लाख टन उसाचे गाळप शिल्लक असल्याचे सांगण्यात येते.
साखर आयुक्तालयाने अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी नियोजनाच्या सूचना केल्या आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात अतिरिक्त उसाची समस्या नाही. फक्त मराठवाड्यात, जालन्याच्या दोन तालुक्यांमध्ये ३ लाख हेक्टरच्या आसपास ऊस जादा असल्याचे पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. अहमदनगर व नांदेड अशा दोन्ही साखर सहसंचालकांच्या कक्षेत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त उसाबाबत काटेकोर नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी दहा दिवसांत आणखी ५० कारखाने बंद होतील.
दरम्यान, गेल्या हंगामात समान कालावधीत २११ कारखान्यांनी १,०२१ टन ऊस गाळला होता. त्यापासून १०१ लाख टन साखर करून १०९ कारखाने बंद झाले होते. त्यावरुन यंदाही राज्यात नेमका किती ऊस आहे, किती साखर तयार होईल, याचा सरकारचा अंदाज चुकला आहे.