बिजनौर : जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के उसाचे गाळप करतील. उसाचे गाळप पूर्ण झाल्यानंतरच साखर कारखाने बंद होणार आहेत. सर्वात प्रथम बिजनौर आणि बिलाई साखर कारखान्याचा गाळप हंगाम पूर्ण होईल. मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात हे कारखाने बंद होऊ शकतात.
जिल्ह्यातील सर्व नऊ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करत आहेत. गेल्या गळीत हंगामाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांकडे तब्बल ११ टक्के ऊस जादा होता. मात्र, यावेळी गुऱ्हाळघरे आणि क्रशर्सना ऊस पुरविला गेला. शेतकऱ्यांनी लवकर शेत रिकामे करण्यासाठी तिकडे ऊस पाठवला. आताही ज्या शेतकऱ्यांकडे तोडणी चिठ्ठी नाही, त्यांच्याकडून बाँड घेऊन तोडणी दिली जात आहे. ऊस दररोज कमी होत आहे. मात्र, कोणताही कारखाना मध्येच गाळप बंद करू शकणार नाही. ऊस संपल्यानंतर परिसरातील उसाचे सर्वेक्षण केले जाईल. शेतकऱ्यांकडे किती ऊस आहे हे पाहून गाळप हंगाम संपुष्टात आणला जाणार आहे. यंदा साखर कारखान्यांनी गाळप लवकर सुरू केले. त्यामुळे कारखाने मे महिन्यात बंद होतील. गेल्यावर्षी जून महिन्यापर्यंत हंगाम सुरू राहिला होता.
याबाबत जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह म्हणाले, शेतकऱ्यांचा शंभर टक्के ऊस गाळप होईपर्यंत हंगाम सुरू राहील. त्यानंतरच कारखाने बंद केले जातील. बिलाई साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक परोपकार सिंह म्हणाले, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातपर्यंत गाळप सत्र सुरू राहण्याची शक्यता आहे. बिजनौर साखर कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक राहुल चौधरी म्हणाले की, सर्व्हेनंतर नोटीस देऊनच कारखाना बंद केला जाईल.