कुशीनगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ७७ कोटी रुपये थकविणाऱ्या कप्तानगंज येथील कनोरिया साखर कारखान्याला सरकारच्या निर्देशानंतर प्रशासनाने सील ठोकले. या कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास ४० कोटी रुपये दिले नसल्याने गेल्या गळीत हंगामात बंद करण्यात आला होता. त्यानंतर कारखान्याविरोधात आरसी जारी करण्यात आली होती.
सरकारच्या निर्देशानंतर कप्तानगंजच्या तहसीलदारांनी कारखान्याला दोन वेळा नोटीस जारी केली होती. मात्र, कारखाना प्रशासनाने त्याला उत्तरही दिले नाही.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याने थकीत बिले देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे सरकारच्या निर्देशानुसार, कप्तानगंजच्या तहसीलदारांनी पोलिस आणि महसूल विभागाच्या पथकांच्या उपस्थितीत कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासह सहा प्रवेशद्वारे सील केली. कप्तानगंज साखर कारखान्याने एकूण ७७ कोटी रुपये थकीत असताना, आरसी जारी झाल्यानंतरही कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर राज्य सरकारने आपली कारवाई सुरू केल्याचे सांगण्यात येते.
यापूर्वी राज्याचे ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी पत्र पाठवल्यानंतर कप्तानगंजचे उपजिल्हाधिकारी व्यास नारायण उमराव यांनी दोनवेळ कारखाना प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यानंतरही प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही. हा कारखाना १९३४ मध्ये स्थापन करण्यात आला होता. ३० किलोमीटर अंतरातील शेतकरी येथे ऊस पाठवत होते. ऊस बिले थकल्यानंतर शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता. यापूर्वी १४ फेब्रुवारी आणि १९ जून रोजी कारखान्याला नोटीस दिली गेली होती. आता ऊस आयुक्तांच्या निर्देशानंतर पुढील कारवाई करू असे तहसीलदार कृष्ण गोपाल त्रिपाठी यांनी सांगितले. तर कारखान्याचे महाव्यवस्थापक नरेंद्र वली यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून कारखाना सोडवून गळीत हंगाम सुरू केला जाईल.