कोल्हापूर : केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणांचा साखर उद्योगाला फटका बसत असल्याने साखर आणि इथेनॉलबाबत मागे-पुढे न करता एक निश्चित धोरण ठरविल्यास साखर उद्योग स्थिर राहील, असे प्रतिपादन वारणा समूहाचे अध्यक्ष, आ. डॉ विनय कोरे यांनी केले. जत (जि. सांगली) येथे कारखान्याच्या १०० एकर जमिनीवर २० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प येत्या दोन वर्षांत कार्यान्वित करण्याची आणि ‘वारणा’च्या सर्व पाणीपुरवठा संस्थांचे वीज बिल १०० टक्के भरणार असल्याची घोषणाही कोरे यांनी सभेत केली.
तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली, यावेळी आ. कोरे बोलत होते. आ. कारखान्याच्या कोरे म्हणाले, गतवर्षीच्या हंगामातील विस्तारीकरणातील सर्व चुका दुरुस्त करून यावर्षी राज्यातील आदर्श कारखाना म्हणून ‘वारणा’ पुन्हा उच्चांकी गाळप करेल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, गतवर्षीची बुलेट बक्षीस योजना यावर्षीही कायम ठेवण्यात आली असून, त्यानुसार १ मार्चनंतर ५० टनांवर पुरवठा करणाऱ्या ५ ऊस उत्पादक भाग्यवंतांना ५ बुलेट व ३० टनांवर ऊस पुरवठा करणाऱ्या भाग्यवंतांना मोटारसायकल बक्षीस देण्यात येणार आहेत.
व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, ऊर्जाकुर प्रकल्पाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन. एच. पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, सर्व संचालक, सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी आभार मानले.