भारताचा नवा, २०२३-२४ मधील ऊस गळीत हंगाम ६० लाख टन साखर साठ्यासह सुरू होईल, अशी शक्यता आहे. हा साखर साठा देशाची अडीच महिन्यांची गरज भागविण्यास पुरेसा असेल. सलग दुसऱ्या वर्षी साखर हंगाम १०० लाख टनापेक्षा कमी साठ्यासह सुरू होणार आहे. याबाबत नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की, असोसिएशनने हंगामासाठी आपल्या पूर्वीच्या साखर अंदाजात सुधारणा केली आहे. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नवीन अंदाजानुसार, देशात साखरेचे ३३४ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. हे उत्पादन गेल्या हंगामात झालेल्या ३५९ लाख टनापेक्षा २५ लाख टनाने कमी असेल. यंदाच्या हंगामात इथेनॉल उत्पादनाकडे ४५ लाख टन साखर वळवली जाईल असे अनुमान आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील गळीत हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. याबाबत महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, आतापर्यंत देशात २६० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. यंदाचा आतापर्यंतचा साखर उतारा ९.७८ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या ९.९३ टक्के साखर उताऱ्यापेक्षा हा ०.१५ टक्केने कमी आहे. महाराष्ट्रात यापूर्वीच्या १३७ लाख टन साखर उत्पादनाऐवजी १२५ लाख टनापर्यंत साखर उत्पादन होईल असे अनुमान आहे. देशांतर्गत २७५ लाख टनांचा खप वजा जाता हंगामाच्या सुरुवातील ६२ लाख टनाचा प्रारंभिक साठा शिल्लक राहिल. यातून देशाची अडीच ते तीन महिन्यांची गरज भागेल असा विश्वास नाईकनवरे यांनी व्यक्त केला. यातून साखरेचे दर स्थिर राहतील. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत देशातील पन्नास टक्के कारखान्यांचे गाळप संपुष्टात येईल, असा अंदाज फेडरेशनने व्यक्त केला आहे.