पूर्णा : वसमतनगर येथील पूर्णा साखर कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारखान्याचे हार्वेस्टर यंत्र आणि ट्रक, ट्रॅक्टरवरील ऊसतोड टोळ्या नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु, तोकड्या टोळ्यांमुळे तालुका क्षेत्रातील उसाची मुदत उलटूनही तोडणी झालेली नाही. त्यामुळे कारखान्याच्या अधिकाऱ्यांसह ओव्हरसीयर, कृषी मदतनीस व स्लिप बॉय यांना शेतकऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे.
आपल्या उसाची तोडणी व्हावी यासाठी शेतकरी गट कार्यालयात, शेती अधिकारी, ओव्हरसीयर, कृषी मदतनीसांकडे चकरा मारत आहेत. तरीही टोळ्या मिळत नसल्याची स्थिती आहे. आता उसाला झेंडे फुटू लागले आहेत. सभासद शेतकऱ्यांच्या ऊसाला वेळेत टोळी मिळत नाही. अद्याप आठव्या व नवव्या महिन्यातील ऊस तोडणी झालेला नाही. त्यामुळे शेतकरी कंटाळून इतर साखर कारखान्यांना ऊस पाठवत आहेत. गौर येथील शेतकरी अर्जुन सोनटक्के यांनी सांगितले की, मी ऊस लागवड करून १३ महिने झाले आहेत. वारंवार विनंती करुनही अद्याप ऊस तोडणी टोळी मिळालेली नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.