महराजगंज : ऊस शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा गेल्या वर्षभरात कल वाढला आहे. २०२० मध्ये केल्या गेलेल्या उसाच्या सर्व्हेमध्ये १६,५०० हेक्टरमध्ये ऊस पीक होते. यावेळी हा आकडा १८ हजार हेक्टरवर पोहोचला आहे. जवळपास १४०० हून अधिक हेक्टर ऊस क्षेत्र वाढले आहे. यातून ऊस शेतीवरील शेतकऱ्यांचा विश्वास वाढल्याचे दिसून येते.
काही काळापूर्वी जिल्ह्यात फरेंदा, घुघली, सिसवा आणि गडौरा येथे साखर कारखाने सरू होते. पूर्वांचलला साखरेचे भांडार म्हणून ओळखले जात होते. मात्र, कालौघात फरेंदा आणि घुघली साखर कारखाने बंद पडले. त्यानंतर ऊस बिले देऊ न शकल्याने आणि कायदेशीर कारवाई केली गेल्यानंतर गडौरा कारखानाही बंद झाल्याने शेतकऱ्यांचा ऊस शेती वरून विश्वास उडाला. मात्र, प्रशासन, ऊस विभाग, कारखाना प्रशासनाच्या प्रयत्नांनी गडौरा साखर कारखाना २०२०-२१ मध्ये सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष पुन्हा ऊस शेतीकडे वळले आहे गडौरा आणि सिसवा साखर कारखाने जर पुन्हा चांगले चालले तर जिल्ह्यात साखरेचे उत्पादन अधिक होऊ शकते.
जिल्हा ऊस अधिकारी जगदीश चंद्र यादव यांनी सांगितले की, ऊस शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढणे ही सुखद बाब आहे. त्यातून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. सध्या सिसवा विभागात ९५०० हेक्टर, घुघली विभागात ५१०० हेक्टर, गडौरा विभागात २९५० हेक्टर आणि फरेंदामध्ये ५०० हेक्टरवर ऊस लागण केली आहे. फरेंदा वगळता इतर विभागात लागणीत वाढ नोंदण्यात आली आहे.