अहमदनगर : थकीत कर्जाच्या वसुलीसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना चालविण्यास देण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे बँकेकडून तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. बँकेतर्फे कारखाना चालविण्यास देण्यासाठी पहिल्या निविदा प्रक्रियेत केवळ एकाच फर्मची निविदा आली. नंतर त्यांनी पाठ फिरवली. दुसऱ्या निविदा प्रक्रियेत जिल्हा बँकेने काही अटी व शर्ती शिथिल केल्या. परंतु, अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अतुल दुगड (पुणे) या खासगी फर्मतर्फे निविदा भरली होती. मात्र, त्यांनी जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाव्यतिरिक्त कारखान्याची इतर देणी देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे, तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
थकीत कर्जामुळे जिल्हा बँकेने सरफेसी ॲक्टनुसार साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला. सलग दोन वर्षे तनपुरे साखर कारखान्याचा गळीत हंगाम बंद आहे. तिसऱ्या वर्षीही उसाच्या टंचाईमुळे कारखाना सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निविदांना प्रतिसाद नाही. याबाबत एडीसीसी बँकेचे प्राधिकृत अधिकारी नंदकिशोर पाटील म्हणाले की, कारखाना चालविण्यास देण्याच्या दुसऱ्या निविदा प्रक्रियेत एकमेव निविदा आली. त्यांनी बँकेच्या थकीत देण्याव्यतिरिक्त कारखान्याची इतर देणी देण्यास असमर्थता दर्शवल्याने ही निविदा संचालक मंडळाच्या बैठकीत रद्द केली आहे. आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवली जाईल.