नवी दिल्ली : चीनी मंडी
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसत आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबिया आणि इतर तेल उत्पादक देशांना दिला. त्याचबरोबर स्थानिक चलनाला तात्पुरता दिलासा मिळावा यासाठी तेलाचे पैसे भागवण्याच्या अटींचाही फेरविचार करायला हवा, असे मत मोदी यांनी व्यक्त केले आहे.
भारत हा तेलाची सर्वाधिक मागणी असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. गेल्या दोन महिन्यांत भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. रुपयाची घसरण झाली असून, चालू खात्यात तूट पहायला मिळत आहे. जगातील आणि भारतातील तेल कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वर्षातील तिसऱ्या बैठकीत मोदी यांनी तेलाच्या किमती चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर असून, त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असरल्याचे सांगितले. बैठकीला सौदी अरेबियाचे तेल मंत्री खालीद ए अल-फाहिल आणि सौदीचे इतर मंत्रीही उपस्थित होते. या आधीच्या बैठकींमध्ये जगातील तेल कंपन्यांनी त्यांना भारतात हव्या असणाऱ्या सुविधा सांगितल्या होत्या. त्या पुरवल्यानंतरही तेल कंपन्या भारतात येण्यास का उत्सुक नाहीत? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
या बैठकीचा इतिवृत्तांत सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, जगातील तेलाचा बाजार पूर्णपणे तेल उत्पादक देशांच्या हातात आहे. कारण, तेलाची किंमत आणि त्याचे प्रमाण हे पुरवठा देशच ठरवतात. त्यामुळे तेलाचे मुबलक उत्पादन झाले तरी, या क्षेत्रातील मार्केटिंगच्या कल्पनांमुळे तेलाची किंमत वाढत जाते.
वाढलेल्या किंमतींमुळे तेलाचे ग्राहक असलेल्या देशांना मोठ्या आव्हानांना समोरे जावे लागत आहे. इतर क्षेत्रांत उत्पादक आणि ग्राहक यांच्यात भागीदार होते. तशी भागीदारी तेलाच्या क्षेत्रात व्हावी, यावर पंतप्रधान मोदींनी जोर दिला. यामुळे तेलाच्या किमती स्थिर राहण्यास मदत होईल. तेल कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेली अतिरिक्त गुंतवणूक विकसनशील देशांमध्ये करावी, तेल उत्पादक आणि ग्राहक देशांमध्ये तांत्रिक देवाण-घेवाण व्हायला हवी, यावरही मोदींनी जोर दिला.
सर्वांत शेवटी पंतप्रधान मोदी यांनी कच्च्या तेलाचे पैसे भागवण्याच्या पद्धतीचा फेरविचार करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे स्थानिक चलनाला थोडा दिलासा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
इंडिया एनर्जी फोरममध्ये बोलताना सौदीचे तेल मंत्री खालीद ए अल-फाहिल म्हणाले, ‘वाढत्या तेलाच्या किमतींचा परिणाम ग्राहकांवर कसा होत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.’ माझ्यासारखा तेल उत्पादक सोन्याची कोंबडी गमावणार नाही, असा टोलाही पंतप्रधान मोदी यांनी लगावल्याचे अल-फाहिल यांनी सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान, अर्थमंत्री अरुण जेटली, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार प्रमुख उपस्थित होते.