रत्नागिरी : कोकणातील जमीन व हवामान ऊस पिकासाठी योग्य आहे असे मानले जात असून खरीप पिकानंतर ऊस लागवड करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोकणात ऊस लागवडीसाठी विद्यापीठाने उसाच्या को-७४०, को. एम.-७१२५ (संपदा), को-७२१९ (संजीवनी) आणि को-७५२७, को- ९२००५, को-८६०३२ या जातींची शिफारस केली आहे. कोकणात उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत करावी, असेही सांगण्यात आले आहे.
कोकणात बहुतांश जमिनीत ओली लागवड करता येते. ऊस लागवड रोपे तयार करून केली जाते. त्यासाठी उसाची रोपे एक डोळा पद्धतीने माती व शेणखत समप्रमाणात वापरून किंवा कोकोपिट आणि गांडूळखत समप्रमाणात घेऊन ५ ग्रॅम ॲझेंटोबॅक्टर जिवाणू संवर्धक प्रती कि. ग्रॅम मिश्रणाच्या प्रमाणात वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
योग्य ओलावा असताना जमिनीची नांगरट करून घ्यावी. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सऱ्या पाडाव्यात. उसाची लागवड सरी वरंबा पद्धतीने करावी. जानेवारीतील लागवडीला मे महिन्यापर्यंत ९ ते १० दिवसाच्या अंतराने पाण्याच्या १५ पाळ्या द्याव्यात. ऊसामध्ये कमी कालावधीत तयार होणारी आंतरपिके घेता येतात. मूळा, लाल माठ, गवार, काकडी, कोथिंबीर पिके घेतली असता उसाच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम न होता अतिरिक्त उत्पन्न मिळते. साधारणपणे १५ जानेवारीपर्यंत लावलेला ऊस पुढील डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात तोडणीसाठी तयार होतो.