फतेहाबाद : हरियाणातील भुथनकला गावातील शेतकरी रेहडा राम यांच्या दोन्ही मुलांनी शेतीत प्रगत तंत्राचा अवलंब करून आपले उत्पन्न दुप्पटीने वाढवले आहे. २०१४ मध्ये त्यांनी प्रायोगिक तत्वावर एक एकर क्षेत्रात उसाची लागवड केली. आता जवळपास १८ एकर क्षेत्रात ऊस पिक त्यांनी घेतले आहे. पारंपरिक शेतीला कंटाळून या भावांनी ऊस शेती करताना स्वतःच्ये उत्पन्न वाढविण्यासह इतरांसमोरही आदर्श निर्माण केला आहे.
हरिभूमी डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शेतकरी राजेंद्र सिंह गढवाल यांनी सांगितले की, गहू, भात या पिकामध्ये उत्पादन खर्चापेक्षा अधिक काहीच मिळत नाही. या पिकांत किटकनाशते, युरीयासारखी खते यांचा खर्च जास्त येतो. अती खते वापरामुळे जमीन नापिक बनण्याचाही धोका आहे. त्यामुळे त्यांनी २०१४-१५ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एक एकरात ऊस लावला. खर्च कमी आणि उत्पन्न अधिक मिळाल्यामुळे २०१५-१६ मध्ये त्यांनी हे क्षेत्र दोन एकक केले. राजेंद्र यांनी केलेली लागवड पाहून त्यांचा मोठा भाऊ देवेंद्र सिंग गढवाल यांनीही शेतीची पद्धत बदलली. आता २०२१-२२ मध्ये एकूण १८ एकरात ऊस शेती आहे. यात देवेंद्र यांच्याकडे ११ एकर तर राजेंद्र यांच्याकडे ७ एकर आहे. शास्त्रोक्त पद्धतीने ते शेती करतात. २०२२-२३ मध्ये २५ एकरवर ऊस पिक घेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. ऊस शेतीमुळे जमिनीची सुपिकता वाढते असे ते सांगतात. ऊस शेती शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी याचे ते स्वतः प्रशिक्षण घेत आहेत. आणि इतरांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.
प्रती एकर ५५० क्विंटल उत्पादन हे दोघेही भाऊ घेत आहेत. जवळपास ११ फूट उंच ऊस त्यांनी उत्पादित केला आहे. कमी खतांचा वापर करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामळे प्रती एक दोन लाखांहून अधिक उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.