अमरोहा : नुकत्याच संपलेल्या हंगाम २०२२-२३ मधील ऊस दर आणि थकीत ऊस बिले तसेच आगामी हंगाम २०२३-२४ मधील ऊसाचे सर्वेक्षण या कामांबाबत जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत अपर जिल्हाधिकारी भगवान शरण यांनी आढावा बैठक घेतली. त्यांनी सर्व साखर कारखान्यांनी आवश्यक ती सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये १७८१.९९ कोटी रुपयांच्या तुलनेत ८९.१० टक्के म्हणजे १५८७.८१ कोटी रुपये ऊस बिले मिळाली आहेत. ऊस समित्यांच्या अंशदानामध्ये २८.४९ कोटी रुपयांच्या तुलनेत २३.१२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ही रक्कम ८१.१५ टक्के आहे. या संथ गतीने पैसे देण्याच्या कामाबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हंगामातील सर्व ऊस बिले आणि ऊस समित्यांचे अंशदान लवकरात लवकर वितरीत केले जावे असे निर्देश त्यांनी कारखान्यांना दिले. ऊस सर्वेक्षणाच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हा ऊस अधिकारी मनोजर कुमार यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.