लखनौ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. राज्यातील ऊस शेती वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुरू आहेत. राज्य सरकार साखर उद्योगाला एका नव्या विक्रमाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे.
साखर कारखान्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासह सरकार ऊसाच्या माध्यमातून अधिक रोजगार निर्मितीचाही विचार करत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगासमोर राज्यातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादनाच्या विकासासाठीचा रोडमॅप सादर केला. राज्य सरकारने केवळ गेल्या सरकारांच्या कार्यकाळात बंद पडलेले साखर कारखाने सुरू केलेले नाहीत तर सध्याच्या कारखान्यांचे आधुनिकीकरण आणि नवे कारखाने सुरू करण्यावरही लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातून उत्तर प्रदेशात देशातील सर्वात जास्त साखर उत्पादनाचा उच्चांक निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात इथेनॉलच्या माध्यमातून ऊसाला हिरव्या सोन्याचे रुप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जानेवारी २०२१ पर्यंत ५४ डिस्टीलरीच्या माध्यमातून राज्यात एकूण २६१.७२ कोटी लीटर इथेनॉल उत्पादन झाले. हे उत्पादन सर्वोच्च आहे. गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच २४३ नव्या खांडसरी सुरू स्थापनेसाठी परवाने देण्यात आले आहेत. त्यापैकी १३३ अधिक खांडसरींचे कामकाज सुरू आहे असे सूत्रांनी सांगितले.