पुणे : कार्वी इंडिया वेल्थ 2019 च्या अहवालानुसार, येत्या पाच वर्षांमध्ये भारतीयांच्या संपत्तीत दुप्पट वाढ होणार आहे. भारतीयांची संपत्ती सध्याच्या 2.62 लाख कोटी रुपयांवरुन 5.28 लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता या अहवालात वर्तवली आहे, अशी माहिती कार्वी प्रायव्हेट वेल्थ चे सीईओ अभिजित भावे यांनी दिली.
कार्वीच्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय लोक शेअर बाजारात थेट गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे 2025 पर्यंत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एक लाख अंकांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शिवाय भारतीयांच्या फिजिकल अॅसेटमध्येही 7.59 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत 2019 मध्ये भारतीयांची संपत्ती 430 लाख कोटीवर गेली आहे.
गुंतवणूकदारांच्या दृष्टीकोनातील बदलाबाबत नमुद करताना अहवालात सांगितले आहे की, भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टीकोनात बदल झाला आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांमध्ये फायनान्शियल अॅसेटचे प्रमाण 57.25 टक्क्यांवरुन 60.95 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तसेच फिजिकल अॅसेटमध्ये 7.59 टक्क्यांची वाढ झाली असून, त्यामध्ये सोने आणि रिअल इस्टेट मिळून हे प्रमाण 92.57 टक्क्यांवर पोहोचले आहे.
अहवालातील नोंदीनुसार, देशातील अब्जाधीशांचा जवळपास सर्वच पैसा शेअर बाजारात गुंतविण्यात आला आहे. देशातील श्रीमंतांची एकूण संपत्ती 2018 मध्ये 430 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. हीच संपत्ती 2017 मध्ये 392 लाख कोटी रुपयांवर होती. मुदत ठेवींवरील गुंतवणूकीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. 2018 पर्यंत मुदत ठेवींमधील गुंतवणूक 8.85 टक्क्यांच्या वाढीने 45 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जगातील दुसर्या क्रमांकांचा सोने आयातदार असणार्या भारतात भारतीयांनी मार्च 2019 पर्यंत 80.94 लाख कोटी रुपयांची सोन्यात गुंतवणूक केली आहे.
अब्जाधीशांची संपत्ती एका दृष्टिक्षेपात
एकूण अब्जाधीश : 2.56 लाख एकूण संपत्ती : 430 लाख कोटी वित्तीय संपत्ती : 262 लाख कोटी स्थावर संपत्ती : 168 लाख कोटी इक्विटीमध्ये गुंतवणूक : 52लाख कोटी मुदत ठेवीं : 45 लाख कोटी विमा गुंतवणूक : 34 लाख कोटी बँकेतील रक्कम : 34 लाख कोटी.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.