सांगली : कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याला जमीन विक्रीसाठी काही अटीवर परवानगी दिली होती. मात्र अटींचे पालन कारखान्याकडून होताना दिसत नाही. महांकाली कारखान्याने सप्टेंबर २०२३ अखेर जिल्हा बँकेची सर्व थकबाकी न भरल्यास जमीन विक्रीचा करार रद्द करू, असा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिला.
महांकाली कारखाना जिल्हा बँकेने थकीत कर्जासाठी ताब्यात घेतला होता. याप्रकरणी कारखान्याने पूर्ण वसुली अपीलीय प्राधिकरणामध्ये (डीआरएटी) दावा दाखल केला. कारखान्याच्या मागणीनुसारच कारखान्याची ८० एकर जमीन विक्री करून जिल्हा बँकेचे कर्ज फेडण्यास बँकेने मान्यता दिली. यासाठी जिल्हा बँक, कारखाना व जागा विकसित करणाऱ्या कंपनीत त्रिपक्षीय करार झाला होता. डीआरएटीनेही या कराराला मान्यता दिली होती.
ओटीएसनंतर महांकाली कारखान्याचे १०१ कोटींचे कर्ज सप्टेंबर २०२३ पर्यंत फेडण्याची अट करारात घातली होती. यासाठी जानेवारी २०२३ पासून कारखान्यास हप्ते तयार करून दिले होते. कारखान्याने सुरुवातीला काही रक्कम भरली, मात्र मार्च अखेर एक रुपयाही भरला नाही. त्यामुळे बँकेने कारखान्याच्या कर्जावरील नियमित व्याजदर आकारण्यास सुरुवात केली आहे. तरीही कारखान्याने थकबाकी भरलेली नाही. आ. नाईक म्हणाले, कर्ज परतफेड करण्याची मुदत आता सव्वा महिना राहिली आहे. या काळात कारखाना व लॅण्ड डेव्हलपर्स कंपनीने जमिनीची विक्री करून जिल्हा बँकेचे कर्ज परत करावे, अन्यथा या मुदतीनंतर जमिनी विक्रीस बँकेने दिलेली परवानगी व याबाबतचा करार रद्द करण्याचा पर्याय जिल्हा बँकसमोर असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले.