अहिल्यानगर : श्रीगणेश साखर कारखान्याने हातात काही नसतानादेखील सव्वा दोन लाख टन उसाचे गाळप केले, ही सभासदांसह कामगारांच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या २०२३- २४ गाळप हंगामाचा सांगता सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाली. या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून आ. थोरात बोलत होते. ते म्हणाले, कारखान्यासमोरील अडचणी संपलेल्या नाहीत. अजूनही ‘गणेश’ला कर्ज मिळू दिले जात नाही. कर्ज मिळाले असते आणि ऊस उपलब्ध झाला असता, तीन- साडेतीन लाख टन उसाचे गाळप झाले असते, असे आ. थोरात यांनी सांगितले.
आ. थोरात म्हणाले, आम्ही कधीच कारखान्यावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरीकडे चालण्यासाठी दिलेला कारखान्याचा पेट्रोल पंप पुन्हा सुरू केला. तीन- चार लाख रुपयांचे उत्पन्न सुरू केले. गळीत हंगामाची जबाबदारी व कामे कामगारांनी पार पाडली. यावेळी ‘गणेश’चे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, प्र. कार्य संचालक नितीन भोसले, संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व अधिकारी उपस्थित होते. युवा नेते विवेक कोल्हे, ‘गणेश’चे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी मार्गदर्शन केले. प्र. कार्य संचालक नितीन भोसले यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी आभार मानले.