हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनीमंडी
गेले काही महिने मंदिमध्ये चाललेल्या साखर उद्योगाला गेल्या काही दिवसांत तेजी पहायला मिळत आहे. मागणी वाढू लागल्याने साखरेच्या दरांवरही चांगला परिणाम दिसत आहे. साखरेची एक्स मिल प्राइस ३१०० रुपये प्रती क्विंटलच्या पुढे गेली आहे. साखर उद्योगाने एकत्रित प्रयत्न केले तर, ही किंमत ३३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले, असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केला आहे.
केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने मे महिन्यासाठी साखरेचा मासिक कोटा २१ लाख टन जाहीर केला आहे. देशातील ५३४ कारखान्यांना मिळून हा कोटा जाहीर करण्यात आला. तसेच ज्या साखर कारखान्यांनी त्यांना देण्यात आलेले निर्यातीचे टार्गेट पूर्ण केले आहे. त्यांना या महिन्यासाठी ७.५ ते १० टक्के अतिरिक्त विक्री कोटा देण्यात आला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे शीतपेयांना वाढलेली मागणी त्यासाठी लागणारा साखर लक्षात घेता बाजारात तेजी पहायला मिळत आहे.
या संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, ‘साखर उद्योगाचे भवितव्य पूर्णपणे आपल्या हातात आहे. मासिक विक्री कोटा अतिशय वाजवी आहे. त्यामुळे साखर उद्योगाने चालू महिना आणि आगामी महिन्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन काम केले पाहिजे. दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त विक्री न होणं आणि उन्हाळ्याच्या अनुषंगाने वाढलेली मागणी याचा आपल्याला फायदा होताना दिसत आहे. साखरेचे दर वाढलेलेच राहतील, यासाठी आता साखर उद्योगातील सगळ्यांना एकत्रित काम करण्याची वेळ आली आहे. साखरेची किंमत सध्या किमान आधारभूत ३१०० रुपये क्विंटलच्या पुढे आहे. जर, आपल्या प्रयत्नांना यश आले तर, साखरेची एक्स मिल प्राइस ३३०० रुपये क्विंटलपर्यंत पोहचू शकते.
गेले काही आठवडे, साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवल्यानंतर मागणी खूपच घटली होती. पण, मे महिन्याचा विक्री कोटा जाहीर केल्यानंतर साखर उद्योगात चैतन्य पहायला मिळत आहे. साखरेच्या बाजारपेठेत अच्छे दिन येतील अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. देशात राजस्थानसह इतर राज्यांमध्ये तापमान ४० अशांच्यापुढे आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात शीतपेयांना मागणी वाढली आहे. परिणामी साखरेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळेच साखरेच्या मंदावलेल्या गाडीला आता वेग येईल, अशी अपेक्षा आहे.