धाराशिव : जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी आगामी गाळप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. यंत्रसामग्रीची दुरुस्ती करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून जवळपास १५ साखर कारखाने आणि चार गूळपावडर निर्मितीचे कारखाने आहेत. मात्र, यंदा जिल्ह्यात १३ साखर कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उसाची कमतरताही भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत साखर कारखाने आहेत.
जिल्ह्यात कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार उसाचे सरासरी क्षेत्र ७४ हजार हेक्टर आहे. गेल्या वर्षी जवळपास १३ कारखान्यांनी आणि चार गूळपावडर निर्मिती कारखान्यांनी उसाचे गाळप केले होते. यंदाही हे सर्व कारखाने गाळप करण्याच्या तयारीत आहेत. कारखान्यांनी मशिनरी अद्ययावतीकरण सुरू केले आहे. यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. साधारणतः दसरा व दिवाळी सणादरम्यान म्हणजे ऑक्टोबर महिन्यात बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम केले जातात. दोन कारखान्यांनी मिल रोलरचे पूजन करून मशिनरीच्या दुरुस्तीला सुरवात केली आहे.