अहिल्यानगर : नेवासा तालुक्यात यंदा ऊस तोडणी व दराची स्पर्धा लागणार आहे. तालुक्यात ज्ञानेश्वर व मुळा हे सहकारी साखर कारखाने असून, या दोन्ही कारखान्यांना यंदा त्यांचे प्रत्येकी बारा ते तेरा लाख मेट्रिक टन ऊस गळीत करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातच माजी मंत्री विजय शिवतारे यांचा वरखेड येथील स्वामी समर्थ शुगर व खुपटी येथील उद्योजक प्रभाकर शिंदे यांचा वैजापूर तालुक्यातील महालगाव परिसरातील पंचगंगा शुगर हे साखर कारखाने तालुक्यातील उस गाळप करण्यासाठी सरसावले आहेत. त्यामुळे उसासाठी साखर कारखान्याची दमछाक होण्याची शक्यता आहे.
‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जिल्ह्यातील शेवगावचा गंगामाई या खासगी कारखान्यासह वृद्धेश्वर-पाथर्डी, विखे पाटील-प्रवरा, थोरात-संगमनेर, अशोक-श्रीरामपूर, कुकडी, श्रीगोंदा अशा जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या तालुक्यात कार्यरत राहणार आहेत. आता स्वामी समर्थ व पंचगंगा यांचीही धुराडी यंदा प्रथमच पेटणार असल्याने ऊस मिळवण्यावरून उसाच्या फडातही दराचा व उस पळवा-पळवीचा संघर्ष दृष्टीस पडण्याची शक्यता आहे. यंदा सर्वच कारखाने पंधरा दिवस उशिराने गळीत सुरू करणार आहेत. तालुक्यात अतिरिक्त ऊस उत्पादन असले की ऊस उत्पादकांचे मात्र ऊसाची विल्हेवाट लावताना दमछाक होत असते, तर कमी उत्पादन असतांना साखर कारखान्यांची दमछाक होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.