सांगली : सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून खरीप हंगामात उसाचा दुसरा हप्ता किती दिला जाणार ? याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नजर लागून राहिली आहे. सरत्या गळीत हंगामात कारखानदारांनी उसाला ३,००० रुपयांच्या आसपास पहिली उचल दिली आहे. दुसरीकडे अनेक कारखानदारांकडून खरीप हंगामात दुसरा हप्ता देण्याची परंपरा मोडीत काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, साखर कारखानदारांनी ठरलेले ७५ रुपये, गत हंगामातील ५० रुपयेही दिले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
आता खरिपाची टोकणी पेरणी पूर्ण झाली आहे. तर आडसाली ऊस लागणीचा धडाका सुरू झाला आहे. शेतकऱ्यांचे मशागत, गावखत, बी-बियाणे, मजुरी, रासायनिक खतांसाठी पैसे खर्च झाले आहेत. मुलांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे खरीप हंगामावेळी दिला जाणारा उसाचा दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. बाजारात साखरेला प्रती किलो ४२ रुपयांपर्यंत भाव आहे. उपपदार्थांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी शेतकरी संघटनांनी आंदोलन करून प्रती टन ५,००० रुपये दर द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र, कारखानदारांनी तीन हजाराच्या आसपासच दर दिला.