देवरिया (उत्तर प्रदेश) : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उर्जेच्या पर्यायी स्त्रोतांबाबत ज्या प्रकारे प्रयत्न सुरू आहेत, त्यावरून लवकरच ऊर्जा वापरात पर्याय शोधता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. देश ऊर्जेचा निर्यातदार बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याबाबत एएनआयमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री गडकरी म्हणाले, जेव्हा देश ऊर्जा प्रदाता बनेल, तेव्हा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांचे भाग्य उजाडेल. या देशाला जागतिक आर्थिक महाशक्ती बनण्याचे स्वप्न शेतकरी साकारू शकतात. मुख्यमंत्री योगी राज्याच्या विकासासाठी सातत्याने आणि गांभीर्याने काम करीत आहेत. देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी इथेनॉल उत्पादनावर भर देण्याची गरज आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासोबत सोमवारी ६,२१५ कोटी रुपयांच्या पाच मुख्य रस्ते योजनांचे देवरिया साखर कारखाना परिसरात भूमिपूजन केले. मंत्री गडकरींचे स्वागत करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश सुरक्षेबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासात वेगाने पुढे जात आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्पांचा लाभ देवरिया आणि शेजारील जिल्ह्यांसह बिहारला मिळणार आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, १२० वर्षांपूर्वी देवरियातील प्रतापपूर येथे उत्तर प्रदेशातील पहिला साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता. देवरिया-कुशीनगरमध्ये 42 साखर कारखाने होते. पण, नंतर ते बंद पडले. आता फक्त चार-पाच कारखाने सरकारच्या प्रोत्साहनामुळे सुरू आहेत. ऊसाचे पैसे वेळेवर मिळतील असा विश्वास शेतकऱ्यांना मिळाला आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे ऊस उत्पादन, साखर उत्पादन, इथेनॉल उत्पादन आणि ऊस दर देण्यात उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपने या उद्योगाचे पुनरुज्जीवन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर भर देत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, डबल इंजिन सरकारने विकास, सुरक्षा आणि गरीब कल्याणाचे मॉडेल दिले आहे. हे मॉडेल सर्वांच्या सहकार्याने, विकासाने, प्रयत्नाने आणि विश्वासाने पुढे जात आहे. उत्तर प्रदेशात महामार्गाचे जाळे विस्तारले जात आहे. आंतरराज्य दळणवळण चांगले झाले आहे. प्रत्येक जिल्हा मुख्यालय जोडले जात आहे. रस्ते विकासाने शहरीकरणास गती आली असून शहरीकरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे प्रयत्न आहेत. विकासाचे नवे मॉडेल तयार केले जात आहे.