सांगली : साखर कारखानदारीबाबत मुक्त धोरण, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आदीसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे ५ फेब्रुवारीपासून भारतीय किसान संघ (सिफा) व देशभरातील विविध शेतकरी संघटनांची राष्ट्रीय परिषद होणार आहे. आंध्र प्रदेश भवनात तीन दिवस ही परिषद चालणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली. परिषदेत देशातील शेती आणि शेतकरी संपन्न होण्याकरिता आगामी १० वर्षाची धोरणे ठरवण्याबाबत विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊन अजेंडा ठरणार आहे. ‘सिफा’चे मुख्य सल्लागार पी. चेंगल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत आहे.
भारतीय किसान संघ- परीसंघ (सिफा) चे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील म्हणाले की, परिषदेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळणेबाबत उपाययोजना राबवणे, जागतिकीकरण आणि भारतीय शेती, पीकविमा, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, शेती संलग्र संस्थांचे एकत्रीकरण शेतीमाल प्रक्रिया व निर्यात वाढवणे, साखर कारखानदारीबाबत मुक्त धोरण आदी विषयांवर चर्चा होईल. परिषदेदरम्यान, विविध राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यात येणार असून त्यांना सिफाच्यावतीने तयार अजेंडा लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडून अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात येणार आहे.