हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर : चीनीमंडी
तीव्र उन्हाळ्यामुळे सध्या धरणांमधील पाणी साठी घटत चालला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर भोगावती व पंचगंगा नद्यांमधील पाण्याचा उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या नद्यांच्या पट्ट्यातील ऊस पिक धोक्यात आले आहे. पाणी मिळाले नाही तर, ऊस जगवायचा कसा असा प्रश्न असल्यानं पुढच्या हंगामासाठी ऊस उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उसाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी आता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचे नियोजन करत आहेत. पुढच्या आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटबंधारे विभागाने एप्रिलनंतर मे महिन्यातही उपसाबंदी जाहीर केली आहे. पण, त्यामुळे शेतातील ऊस जगावायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. कोल्हापूरच्या परिसरातील ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी सहकारी पाणी पुरवठा संस्था काम करतात. त्यामुळे या संस्थांचे पदाधिकारी पाण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.
पाणी पुरवठा संस्थांमार्फत होणाऱ्या पुरवठ्यामध्ये दर १५ दिवसांनी पाण्याचा फेरा येतो. आता उपसाबंदीच्या निर्णयाने फेरा येण्याला २५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे उपसाबंदीचा परिणाम राधानगरीपासून ते शिरोळ तालुक्यापर्यंत नदीकाठच्या ऊस शेतीवर होण्याची शक्यता आहे.
भोगावती आणि पंचगंगा नदी काठी मोठ्य़ा प्रमाणावर ऊस पट्टा आहे. उपसाबंदीमुळे एकरी दहा ते पंधरा टन उसाचा फटका बसणार आहे. त्यामुळेच करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे. त्यातूनही मार्ग न निघाल्यास आंदोलनाचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे.