भारतात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. ऊस उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत मात्र ऊस शेतीत सातत्याने नुकसान होत असल्याने उत्पादनात घसरण दिसून आली आहे. त्यामुळे कृषी तज्ज्ञांकडून ऊसाच्या पिकांसोबत अनेक पूरक पिकांची लागवड करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यातून जादा नफा मिळवता येणे शक्य आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना पूरक पिकांचे उत्पादन करण्याचे तंत्र वापरावे यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. शेतकरी एका मुख्य पिकासोबत शेतात ४ ते ५ पिके घेऊ शकतो. या पिकांपासून कमी कालावधीत जादा नफा मिळतो. त्यातून मुख्य पिकांचा खर्च तर निघू शकेल आणि अतिरिक्त फायदाही शेतकऱ्यांच्या पदरात पडू शकतो.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कृषी संशोधक डॉ. दया श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, उसासोबत लसूण, आल्ले, मेथी, जवस याचे उत्पादन घेता येऊ शकते. यासोबतच भाजीपाला लागवड केली जाऊ शकते. ऊस पिकासाठी १३ ते १४ महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, ही पिके ६० ते ९० दिवसात उत्पादन मिळवून देतात. यातून शेतकरी आपल्याकडील शेतीतून अधिक उत्पादन मिळवू शकतो. उसाच्या प्रारंभीच्या वाढीच्या अवस्थेत या पूरक पिकांचे उत्पादन घेता येते. डाळवर्गीय पिकांपासून जमिनीचे आरोग्यही चांगले राहते असे श्रीवास्तव यांनी सांगितले.