जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये दिवाळी सणासाठी ऊस उत्पादकांना प्रती टन ५० रुपये दरवाढ देऊन ऊसदराचा तिसरा हप्ता दिला आहे. या हप्त्यासह एकूण २९०० रुपये प्रती मे. टनाप्रमाणे ऊस उत्पादकांना रक्कम अदा करण्यात आली आहे. कारखान्याचे सभासद व लाभार्थी सभासदांना दिवाळीनिमित्त खास बाब म्हणून प्रत्येक सभासदास १० किलो साखर १५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दरात २१ ते ता. ३० ऑक्टोबरपर्यंत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.
अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना पहिला हप्ता २७५० रुपये दिला. तर, दुसरा हप्ता १०० रुपये प्रती मे. टनाप्रमाणे यापूर्वी अदा केला. आता दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त ५० रुपये प्रती टनाप्रमाणे होणारी रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. आता सभासदांना साखर वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी सभासदांनी साखर वाटप कार्ड दाखविणे आवश्यक आहे. अंकुशनगर येथील मंगल कार्यालयातील साखर वाटप केंद्र, तीर्थपुरी येथील साखर वाटप केंद्र आणि कारला येथील साखर वाटप केंद्रावर याचे वितरण होईल. तर कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीर्थपुरी येथे दिवाळी सणानिमित्त साखर देण्यात येणार आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.