सीहोर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान समर्थन दरावर गहू विक्री करण्याची शेतकऱ्यांची ईच्छा नसल्याचे दिसून येत आहे. कधी तांत्रिक अडचणी, केंद्रांवरील गैरव्यवस्था अशा कारणांनी शेतकरी आपले पिक घेवून मंडयांमध्ये जात आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी जिथे जिल्ह्यात पाच दिवसांत ७०,००० टन गव्हाची खरेदी झाली होती, तिथे यंदा १६ दिवसात १.८८ लाख टनापर्यंत खरेदी होऊ शकली आहे.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किमान समर्थन मूल्यावर पिकाची विक्री करण्यासाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. या दरावर यापुढील काळात आणखी खरेदी होईल अशी स्थिती नाही. कारण, खरेदी केंद्रावर कठिया गहू विक्रीसाठी येतो आणि जवळपास ४५ टक्क्यांहून अधिक गव्हाची मंडईत विक्री झाली आहे. मंडयांमध्ये अधिक दर शेतकऱ्यांना मिळत आहे. यंदा जिल्ह्यात कठीया गव्हाच्या वेगवेगळ्या प्रजातींची पेरणी करण्यात आली होती. जवळपास १ लाख हेक्टरमध्ये हे पिक घेण्यात आले. त्यापासून एकूण ५ लाख टनापर्यंत उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील मंडयांमध्ये आतापर्यंत १२ लाख टनापेक्षा अधिक गव्हाची खरेदी झाली आहे. यामध्ये ४५ टक्के कठिया गव्हाचा समावेश आहे. खरेदीही दरवर्षी घटत असल्याचे दिसते. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात ६.६५ लाख टन गव्हाची खरेदी झाली होती. तर गेल्यावर्षी जिल्ह्यात ४.५२ लाख टन गहू खरेदी झाली. यंदा हे उद्दिष्ट गाठणेही मुश्किल होईल अशी स्थिती आहे.
दोन वर्षांपूर्वी किमान समर्थन मूल्यावर गहू खरेदीसाठी १ लाख १५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी ही संख्या ९४ हजार ६७३ वर आली. तर यंदा ८० हजार ३५ शेतकऱ्यांनीच आपल्या पिकाची नोंदणी केली आहे.