सोलापूर : मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील आष्टी शुगर साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेत प्रति दिन अडीच हजार मेट्रिक टनावरून साडेसात हजार मेट्रीक टनापर्यंत वाढ करण्यात आली आहे. चालू हंगामात कारखान्याने साडेपाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र सरकारने गाळप क्षमता वाढीस नुकतीच परवानगी दिल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांनी दिली.
‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आष्टी शुगरकडून यापूर्वी प्रतिदिन अडीच हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले जात होते. कारखान्याने जादा गाळपासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. त्यास मंजुरी मिळाली आहे. सध्या कारखान्यात दहा मेगॅवॅटचा वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित असून, कारखाना लवकरच असावनी प्रकल्प हाती घेणार आहे, असे कारखान्याचे जनरल मॅनेजर संजीव गुरव यांनी सांगितले.
गुरव म्हणाले की, आगामी गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज आहे. यंदा साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रातील उसाची नोंद कारखान्याकडे झाली आहे. कारखान्याने ऊस वाहतुकीसाठी २२५ ट्रॅक्टर, १७५ मिनी ट्रॅक्टर, ३२५ बैलगाड्यांबरोबर करार केला आहे. ऊस तोडणी यंत्रणेला आगाऊ रकमेचे वाटपही केले आहे. शेतकऱ्यांना एकरी उत्पादन कसे वाढवावे यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात तज्ज्ञ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतील. यावेळी सरव्यवस्थापक गुरव यांच्यासह चीफ अकाऊंटंट तुकाराम देवकाते, मुख्य अभियंता दीपक कळसाईत, चिफ केमिस्ट रामचंद्र समुद्रे, शेती अधिकारी दीपक खटके उपस्थित होते.