कोल्हापूर : तुटणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी एफआरपीसह ३७०० पहिली उचल जाहीर करा, मगच उसाला कोयता लावा. शिवाय गतवर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपूर्वी २०० रुपये दुसरा हप्ता सर्व कारखानदारांनी द्यावाच लागेल, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत दिला.
जयसिंगपूर येथे शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २३ वी ऊस परिषद झाली. अध्यक्षस्थानी शिवाजीराव रोडे होते. प्रारंभी स्वागत शैलेश आडके तर प्रास्ताविक विठ्ठल मोरे यांनी केले. शेट्टी म्हणाले, गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसाला दिवाळीपूर्वी प्रती टन २०० रुपयांचा हप्ता देण्यात यावा आणि यंदाच्या पुरामध्ये नुकसान झालेल्या ऊस व अन्य पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचा ठरावही या ऊस परिषदेत करण्यात आला.१७ नोव्हेंबरला कारखाने सुरु होणार आहेत. २१ दिवसांची अजून मुदत शिल्लक आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय कारखानदारांनी घ्यावा अन्यथा गाठ ‘स्वाभिमानी’शी आहे, असेही ते म्हणाले.
शेट्टी म्हणाले, २००२ साली पहिली ऊस परिषद झाली होती. सध्या २३ वी ऊस परिषद सुरु आहे. तुम्ही मला साथ द्या अगर न द्या माझे काम मी करत राहणारच, मी कधीही खचणार नाही. लढाई अशीच सुरूच ठेवणार, सध्या शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. वेळीच चळवळीला साथ या अन्यथा हे सांगण्यासाठी कोणीही नसणार आहे. चळवळीतून जेथडे काम करता येईल करणार आहे, अशी भावनिक हाक शेट्टी यांनी दिली. यावेळी हुक्कीरेचे माजी पालकमंत्री शशिकांत नाईक, पोपट मोरे, वैभव कांबळे, जनार्दन पाटील, अजित पवार, सूर्यभान जाधव, महेश खराडे, रसिका ढगे, राजेंद्र गड्याण्णावर, प्रकाश पोफळे, संतोष काकडे, विजयकुमार कोले, सचिन शिंदे, आण्णासो चौगुले, सुवर्णा अपराज, आसावरी आडके, राम शिंदे आदी उपस्थित होते.
ऊस परिषदेत झालेले ठराव…
वजनकाटे ऑनलाइन करा.
एकरकमी एफआरपीसह ३७०० रुपये द्या.
नाबार्डने साखर कारखान्यांना ३ टक्के व्याजदराने साखर तारण कर्ज द्यावे.
शेतीपंपांना दिलेल्या वीज सवलतीमध्ये एचपीची अट काढावी.
खांडसरी, गूळ प्रकल्पांना सिरपपासून इथेनॉल करण्यास परवानगी द्यावी.
वाहतूक खर्चासाठी अंतरानुसार टप्पे तयार करून त्यानुसार वसुली करावी.
फसवणूक करणाऱ्या ऊसतोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल करा.
गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपूर्वी २०० रुपये द्यावेत.
अतिवृष्टी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकयांना तत्काळ मदत द्या.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.