यंदाही ऊस दरावरून कारखानदार-शेतकरी संघटनांत संघर्षाची शक्यता

कोल्हापूर : गेल्यावर्षी राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना केवळ एफआरपीप्रमाणे रकमा दिलेल्या आहेत. मात्र, उपपदार्थांसह इतर उत्पन्न गृहित धरून फरक मिळावा आणि यंदा उसाला प्रती टन ५००० रुपये दर मिळावा अशी मागणी राज्यातील शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे. त्यामुळे यंदा या मागणीवरून कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये संघर्ष अटळ असल्याचे चित्र आहे. सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला एफआरपी आणि जादा प्रति टन ४०० रुपयांच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे.

गेल्यावर्षी साखर कारखान्यांनी प्रती टन २८०० ते ३१०० रुपयांपर्यंत ऊस बिले दिली. मात्र, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये साखरेचा दर तेजीत राहिल्याने अनेक कारखान्यांना प्रती क्विंटल ३५०० ते ३८५० रुपयांपर्यंत दर साखरेला मिळाल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या उसाला प्रती टन सरासरी ४०० रुपये जादा देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय, यंदा उसाला ५,००० रुपये प्रती टन दराची मागणी आहे.

राज्यात माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना अशा विविध संघटना कार्यरत आहेत. याबाबत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले की, गेल्या गळीत हंगामातील उसाला प्रती टन १००० रुपये फरक बिले द्यावीत, कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी अन्यथा यंदा उसाला प्रती टन ५००० रुपये भाव द्यावा अशी आमची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here