सोलापूर : जिल्ह्यात गाळप हंगामाने गती पकडली असून आतापर्यंत साडेतीन लाख टन ऊस गाळप झाले आहे. चार ते पाच कारखान्यांचा अपवाद वगळता सर्व कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात उसाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे कारखानदारांमध्ये ऊस मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखान्यांनी २५०० ते २६०० रुपये प्रतीटन दर जाहीर केले आहेत. मात्र, होटगी येथील सिध्देश्वर साखर कारखान्याने २९०० रुपये दर जाहीर केल्यामुळे आता इतर कारखान्यांकडूनही ऊस मिळविण्यासाठी दराची चढाओढ सुरू झाली आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये जास्त दर देण्याची स्पर्धा लागली आहे. गळीत हंगामासाठी जिल्ह्यातील जवळपास ४० साखर कारखान्यांपैकी ३८ कारखान्यांनी परवानगी मागितली होती. उसाच्या संभाव्य तुटवड्याच्या धास्तीने ऊस दर स्पर्धेत भरच घातली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अंदाजे तीन लाख ५० हजार टन उसाचे गाळप झाले आहे. यंदाच्या वर्षी कमी ऊस असल्याने ८० ते ९० दिवस गाळप हंगाम चालण्याची शक्यता आहे.