कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या तीन कार्यकारी संचालकांसह (एमडी) प्रमुख विभागांच्या आठ अधिकाऱ्यांनी अवघ्या वर्षभरात राजीनामा दिला आहे. कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेकडून ५५ कोटी व उसाची बिले भागवण्यासाठी ४४ कोटींचे कर्ज देण्यात आले. तरीही फेब्रुवारी- मार्चमधील ऊस बिल थकीत आहेत.
दोन दिवसांपूर्वी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ७ संचालकांनी ऊस बिलासाठी जिल्हा बँकेचे दार ठोठावले. आर्थिक संकटातून वाटचाल करणाऱ्या गडहिंग्लज साखर कारखान्यासमोर अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे संकट उभे ठाकले आहे. डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान कार्यकारी संचालक औदुंबर ताबे, सुधीर पाटील, महावीर घोडके यांनी राजीनामा दिला आहे. तर टेक्निकल विभागाचे जनरल मॅनेजर संभाजी सावंत, प्रताप पाटील, चीफ इंजिनिअर दिलीप कांबळे, फायनान्स मॅनेजर रघुनंदन जोशी, प्रकाश चव्हाण, मटेरिअल विभागाचे मॅनेजर श्रीकांत सुतार, सिनीअर इंजिनिअर अरविंद तेली, जनरल मॅनेजर (प्रोसेस) आरवा प्रसाद या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
२०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या गटाकडे सत्ता आली. परंतु, आर्थिक अडचणीमुळे गेल्या हंगामात कारखाना बंद राहिला. मंत्री मुश्रीफ यांनी पुढाकार घेत जिल्हा बँकेतून कारखान्याला तब्बल ५५ कोटींचे कर्ज दिले. कारखान्याचे गाळप उशिरा सुरु झाल्यामुळे केवळ १ लाख ३८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे.