पुणे : राष्ट्रीय साखर संघ आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त केंद्र सरकारच्यावतीने देशभरातील ऊस शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापरासह विविध प्रकल्प राबविणार आहे. कारखाना गाळप हंगाम संपल्यानंतर उर्वरीत दिवसांमध्ये कसा वापरला जाईल आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर मिळणाऱ्या सुमारे २६५ दिवसांमध्ये कारखाना सुरू ठेवण्यासाठी मक्यापासून इथेनॉल उत्पादनाचे प्रयोग सुरू आहे. यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि उत्तरप्रदेशात कॅम्प घेण्यात येणार आहेत. यासाठी उसात मक्याचे आंतरपीक घेऊन, त्याचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी कसा करता येईल याचा विचार सुरू आहे. हे उत्पादित इथेनॉल केंद्राने खरेदी करावे अशीदेखील मागणी केंद्राकडे केली आहे.
त्यांनी सांगितले की, यंदाच्या देशभरात साखर उत्पादनात १७ टक्के घट झाली. यामध्ये उत्तरप्रदेशातील २३८ वाणाच्या उसावर झालेला कीड रोगांचा प्रादुर्भाव, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातील उसाला लवकर आलेला तुरा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे दीड महिन्यांनी उशिरा सुरू झालेला हंगाम अशा कारणांचा समावेश आहे. आगामी हंगामासाठी राष्ट्रीय साखर संघाने केंद्र सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. ऊस तोडणी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी देशभरात १० हजार हार्वेस्टर घेण्यात येणार आहेत. नवीन लागवड तंत्रज्ञानाचा वापरावर भर देण्यात येणार आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर देशभारत करण्याचा मास्टरप्लॅन केंद्र सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.