भोगावती साखर कारखान्यासाठी तिरंगी लढत

कोल्हापूर : परिते शाहूनगर (ता. करवीर) येथील श्री भोगावती सहकारी साखर कारखान्यासाठी अखेर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडी, दादासाहेब पाटील – कौलवकर पॅनेल आणि शिव-शाहू परिवर्तन आघाडी अशी लढत रंगणार आहे. जागा वाटपावरून अखेरच्या क्षणापर्यंत नाट्यमय घडामोडी झाल्या, मात्र विरोधकात एकमत होऊ शकले नाही. माजी चेअरमन धैर्यशील पाटील -कौलवकर यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका स्पष्ट केली. तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, स्वाभिमानी व शेकापचा फुटीर गट यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली.

दरम्यान, अखेरच्या दिवशी ३७३ उमेदवारांनी माघार घेतल्याने २५ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सत्तारुढ काँग्रेस आघाडीला यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व जनता दलाने पाठिंबा दिली आहे. सत्ताधारी गटाविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी ‘यु टर्न’ घेत सत्तारुढ गटाला पाठिंबा दिला. श्रीपतरावदादा बँकेत चेअरमन डोंगळे यांनी आमदार पी. एन. पाटील यांची भेट घेतली. तर डॉ. जालिंदर पाटील, बाबासो देवकर, अजित पाटील, संजय डकरे यांनी कळंबा येथे तिसऱ्या पॅनेलची घोषणा केली.

 

आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीच्या पॅनेलची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पी. एन. पाटील गटाला १४, तर ए. वाय. पाटील व शेकाप यांना प्रत्येकी ५, तर जनता दलाला एक जागा देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here