सोलापूर : सध्या अडचणीतून मार्गक्रमण करणाऱ्या साखर उद्योगाला उर्जितावस्था आणण्यासाठी काटकसरीने कारभार करणे महत्वाचे असल्याचे मत धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले. संत दामाजी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि मिल रोलर पूजन प्रा. काळुंगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी चेअरमन नंदकुमार पवार होते.
प्रा. काळुंगे म्हणाले, डिस्टलरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कार्कःण्याला आर्थिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य द्यावे लागेल, असेही ते म्हणाले. पवार यांनी यंदा कारखान्याने ५ लाख टन ऊस गाळप करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले कि, संचालक मंडळाने अनावश्यक खर्च टाळून काटकसरीने कारभार करण्यावर भर दिला आहे. यावेळी प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय, व्हाईस चेअरमन तानाजी खरात, मुरलीधर दत्तू, राजेंद्र पाटील, बसवराज पाटील, अजित जगताप, काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते.