पुणे : थकीत एफआरपीप्रश्नी राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. राज्यातील ऊस गाळप हंगाम २०२३-२४ मधील गाळप केलेल्या उसाचे रास्त आणि किफायतशीर किमतीचे (एफआरपी) सुमारे २१ कोटी ६५ लाख ९८ हजार रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी सोलापूरमधील दोन आणि धाराशिव जिल्ह्यातील दोन, अशा चार साखर कारखान्यांवर जप्तीचे (आरआरसी) आदेश साखर आयुक्त डॉ. कृणाल खेमनार यांनी काढले आहेत.
जयहिंद शुगर प्रा. लि. आचेगाव, (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) या कारखान्याकडे ७ कोटी ८७ लाख २७ हजार रुपये, द सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. माळीनगर, (ता. माळशिरस, जि. सोलापूर) या कारखान्याने १ कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये थकीत ठेवले आहेत. भीमाशंकर शुगर मिल्स लि., मु. पो. पारगाव (ता. वाशी, जि. धाराशिव) कारखान्याने ६ कोटी ८८ लाख ५३ हजार रुपये, लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. खेड-लोहारा खु. (ता. लोहारा, जि. धाराशिव) ५ कोटी ३७ लाख ५२ हजार रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (जप्तीच्या कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सोलापूर आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांना कारवाई करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कारवाई आता संबंधित जिल्हाधिकारीस्तरावरून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.