कोल्हापूर : साखर उद्योगास अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने साखरेचा हमीभाव ४२ रुपये करण्याची गरज आहे, असे मत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केली. कारखान्याच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका सहकारी साखर कारखानदारीस बसून कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत, अशी टीका त्यांनी केली. आगामी हंगामातील कारखान्याच्या ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती त्यांनी दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या हंगामात साखरेचे उत्पादन कमी होईल म्हणून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीस बंदी घातली. या निर्णयाचा फटका कारखानदारीस बसला. उत्पादनाचे अंदाज चुकून साखर उत्पादन जादा झाले. परिणामी, दर पडून कारखाने आर्थिक अडचणीत सापडले. ही स्थिती बदलण्यासाठी योग्य निर्णयांची गरज आहे. यावेळी सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभेस व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, विलास पाटील, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रवींद्र पाटील, संजय पडवळ, महादेव पडवळ, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते. सचिव नंदू पाटील यांनी आभार मानले.