नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज, बुधवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. आज डिझेलच्या दरात १३ ते १८ पैशांची वाढ झाली. तर डिझेल ३३ ते ३५ पैशांनी महागले. या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले.
आज दिल्लीत पेट्रोलचे दर १००.२१ रुपये तर डिझेलचा दर ८९.५३ रुपये प्रती लिटर झाला. मुंबईत पेट्रोल १०६.२५ आणि डिझेल ९७.०९ रुपये प्रती लिटर या दराने विक्री होत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिसा, जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे. याशिवाय महानगरांपैकी मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे याआधीही पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले होते.
पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता दरात बदल केला जातो. एक्साझज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर कर जोडल्यानंतर मूळ दर दुप्पट होतो. कंपन्या दर स्वतः ठरवतात. विविध तेल कंपन्यांकडून प्रत्येक शहराचे दर एसएमएसद्वारे जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय वेबसाईटवर अधिकृत दर समजू शकतात.