परभणी : टोकाई सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची ४ कोटी २५ लाख ऊस बिले थकली आहेत. कारखाना वाचवण्यासाठी ‘पूर्णा’ ने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चार दिवसांपूर्वी ‘टोकाई’ कारखाना ‘पूर्णेला’ भाडे तत्वावर देण्यासाठी अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, अशी मागणी करत साखर आयुक्तांना सभासदांनी निवेदन दिले. या सर्व घडामोडींनी वेग घेताच ‘टोकाई’चे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी २०२३-२४ गाळपातील शेतकऱ्यांचे थकीत ऊस ४ कोटी २५ लाख रुपयांपैकी ३ कोटी २५ लाख सोमवार रोजी शेतकऱ्यांच्या खाती जमा केले. उर्वरित १ कोटी रुपये बुधवारी जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
यंदा गाळपाची परवानगी नसताना टोकाई कारखान्यात गाळप करण्यात आले. दुसरीकडे टोकाई सहकारी साखर कारखाना डबघाईस आला असून, शेतकऱ्यांची थकीत ‘एफआरपी’ व बँकांचे कर्ज देण्यासाठी मशिनरी विक्रीच्या निविदा काढण्यात आल्या. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी सभासदांनी मागणी केली. त्यामुळे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी थकीत रकमेपोटी ३ कोटी २५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारी जमा केले. थकीत रकमेसाठी गत महिन्यात शेतकऱ्यांनी ‘टोकाई’ अध्यक्षांच्या निवासस्थानी आक्रोश व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले होते.