कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात असून ९९ जणांनी माघार घेतली. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, भाजप, शिवसेना आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. याशिवाय, ६ अपक्ष रिंगणात आहेत. कारखान्याच्या या निवडणुकीत एक जागा बिनविरोध झाली आहे. भटक्या विमुक्त जाती गटातून शिवसेनेचे संभाजी पाटील बिनविरोध निवडून आले आहेत.
कारखान्याची निवडणूक चुरशीने होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या टप्प्यात निवडणूकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र, नंतर पक्षाने भूमिका बदलली. निवडणूक बिनविरोध होत नसल्याने आणि कार्यकर्त्यांचा रेटा वाढल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा रिंगणात येण्याचा निर्णय घेत पॅनेल तयार केले असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित श्री रवळनाथ विकास आघाडी आणि भाजप, राष्ट्रीय कॉग्रेस, शिवसेना प्रणित श्री चाळोबा विकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगेल. याशिवाय तुळसाप्पा पोवार, शामराव बोलके, दिगंबर देसाई, महादेव होडगे, शांताराम पाटील, आनंदा पाटील हे अपक्ष रिंगणात आहेत.