भारत-मलेशिया यांदरम्यान आता भारतीय रुपयात व्यापार शक्य

नवी दिल्ली : भारत आणि मलेशियामधील व्यापार आता इतर चलनांतील सध्याच्या पद्धतींव्यतिरिक्त भारतीय रुपयामध्ये केला जाऊ शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सेटलमेंटला परवानगी देण्याचा निर्णय जुलै २०२२ मध्ये घेण्यात आला. जागतिक व्यापाराच्या वाढीला सुलभ स्थिती निर्माण करणे आणि भारतीय रुपयाचे जागतिक व्यापारी समुदायात हित जपणे हा आरबीआयचा यामागील उद्देश आहे. मलेशियाकडून भारत देशांतर्गत खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाम तेल व इतर डेरिव्हेटिव्हजची आयात करतो.

परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी क्वालालंपूर स्थित इंडिया इंटरनॅशनल बँक ऑफ मलेशियाने भारतातील संबंधित बँकेद्वारे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विशेष रुपी व्होस्ट्रो खाते उघडून ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या व्यापार सेटलमेंटबद्दल अधिक तपशील त्यांच्या वेबसाईटवर (www.Indiainternationalbank.com.my) मिळवता येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, भारताने शुक्रवारी नवीन परकीय व्यापार धोरण २०२३ चे लाँचिंग केले. या अंतर्गत २०३० पर्यंत देशाची निर्यात USD २ ट्रिलियनपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात खास करुन रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यावर भर दिला गेला आहे. सरकार भारतीय रुपयाला जागतिक चलन बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहिल. यातून भारतीय चलनाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यास मदत करेल. भारत सध्या आणखी काही देशांसोबत रुपयामध्ये व्यवहार करीत आहे. (ANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here