नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताने गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता पुढील टप्प्यात साखर निर्यातीवरही बंदी घातली जाऊ शकते, अशी भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे. जागतिक साखर पुरवठ्यातील असमतोलामुळे जग दक्षिण आशियाई देशांवर साखर निर्यातीसाठी अवलंबून आहे. तर दुसरीकडे भारतातील ऊस उत्पादक राज्यांमध्ये झालेल्या असमान पावसामुळे साखरेचे उत्पादन कमी होण्याची चिंता निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी, साखरेचे उत्पादन कमी होईल, असे अंदाज वर्तवले जात आहे.
इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऊस उत्पादन घटल्यास भारताची साखर निर्यात करण्याची क्षमता मर्यादित राहू शकेल. देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवणे आणि किमती स्थिर राखण्यासाठी सरकारने आधीच गहू आणि बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आधीच खराब हवामान, युक्रेनमधील संघर्षामुळे जागतिक अन्न पुरवठा बाजारावर ताण आला आहे.
याबाबत ट्रॉपिकल रिसर्च सर्व्हिसेसच्या साखर आणि इथेनॉल विभागाचे प्रमुख हेन्रिक इकामाईन यांनी सांगितले की, तांदूळ निर्यात बंदी हे सरकार अन्न सुरक्षा आणि महागाईबद्दल चिंतीत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सरकार कदाचित साखरेबाबतही त्याचे अनुकरण करेल, अशी शक्यता आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मुख्य ऊस उत्पादक प्रदेशात जूनमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उसाचे उत्पादन घटू शकते. साखर उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत ३.४ टक्क्यांनी घसरून यंदाच्या २०२३-२४ या हंगामात ३१.७ दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे. यातून देशांतर्गत मागणी पूर्ण होईल, असा विश्वास झुनझुनवाला यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भारत इथेनॉल उत्पादनासाठी अधिक साखर वापरण्याची तयारी करत आहे. इथेनॉल उत्पादनासाठी साखर कारखाने ४.५ दशलक्ष टन साखर वळवतील. एक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ९.८ टक्के जास्त आहे, असे झुनझुनवाला यांनी सांगितले. भारताने यापूर्वीही साखर निर्यातीवर निर्बंध घातले होते. २०२२-२३ या हंगामासाठी, ६.१ दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी देण्यात आली. त्याआधीच्या वर्षात ११ दशलक्ष टन इतकी उच्चांकी साखर निर्यात करण्यात आली होती.