कायमगंज : साखर कारखान्याच्यावतीने असगरपूर येथे झालेल्या कार्यशाळेत कृषी वैज्ञानिकांनी जादा ऊस उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. नेहमीच्या युरियाऐवजी नॅनो युरियाचा वापर करण्याबाबत यावेळी माहिती देऊन त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सहकारी साखर कारखाना आणि ऊस विकास संस्था शाहजहांपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायमगंज साखर कारखाना कार्यक्षेत्रातील असगरपूरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने ऊस शेती या विषयावर मार्गदर्शनात्मक कार्यशाळा झाली.
यावेळी संस्थेचे सहाय्यक संचालक पी. के. कपिल, कृषी वैज्ञानिक आर. डी. तिवारी यांनी ऊसाच्या चांगल्या प्रजाती, त्याची उपयुक्तता, पाण्याचा कमी वापर कराव्या लागणाऱ्या प्रजातीची माहिती दिली. साखर कारखान्याचे मुख्य ऊस अधिकारी प्रमोद कुमार यादव यांनी ऊस व्यवस्थापनाची माहिती दिली. ऊस विभागाचे एससीडीआय अशोक कुमार यादव, अजित कुमार मिश्रा, डी. के. सिंह, शमशेर सिंह आदींनीही यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शनात्मक टिप्स दिल्या.