नवी दिल्ली : चीनी मंडी
चीनच्या साखर बाजारपेठेशी दीर्गकालीन संबंध प्रस्थापित होतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. यंदाच्या हंगामाचा विचार केला, तर चीनला २० लाख टन साखर निर्यात होईल, अशी आशा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. चीनच्या साखर उद्योगातील शिष्टमंडळाने नुकतीच संघाच्या प्रतिनिधींची दिल्लीत भेट घेतली.
भारतातील साखर उद्योगाला चीनची बाजारपेठ खुली करून देण्याचे भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत तेथील साखर उद्योगाशी निगडीत प्रतिनिधींचे शिष्टमंडळ सध्या भारत दौऱ्यावर आले आहे. त्यात चीनमधील काही रिफायनरीजचे मालक, साखर व्यापारी, अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. देशातील साखर उत्पादक राज्यांना ते भेट देणार आहेत. त्यातच त्यांनी दिल्लीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. त्यात संघाच्या प्रतिनिधींसह रेणुका शुगर्सचे रवी गुप्ता यांचाही समावेश होता.
चीनच्या शिष्टमंडळाने भारतातील साखर उद्योगातील उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक आणि वाहतुकीची माहिती घेतली. त्यांना देण्यात आलेल्या माहितीवर ते समाधानी असल्याचे साखर कारखाना संघाकडून जाहीर करण्यात आले.
चीनचे शिष्टमंडळ येत्या १० डिसेंबरला उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. तर त्यानंतर १२ डिसेंबरला ते महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांना भेटी देणार आहेत.