कोल्हापूर : पंधरा दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा जोरदार तडाखा बसला. कोल्हापूर, कराड, सांगली जिल्ह्यातील ऊस शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. पुरामुळे तिन्ही शहरांच्या बाजारपेठांचा संपर्क तुटल्यामुळे त्याचा फटका बाजारपेठेलाही बसला होता. महापुरामुळे जवळपास दहा दिवस साखरेची वाहतूक बंद होती. याचा फटका साखरेच्या बाजारपेठेला बसला. पण, आता साखर उद्योगाला एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने लागू केलेल्या नव्या नियमामुळे कोल्हापूर, सांगली आणि कऱ्हाडमधून साखरेचा पुरवठा थंडावण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने नुकतेच एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यानुसार आता ‘ज्याचा माल, त्याचा हमाल आणि ज्याचा माल, त्याचा विमा’ या नियमाचे पालन केले जाणार आहे. या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना असोसिएशनच्या पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत. पत्रानुसार जो वाहनधारक किंवा ट्रकधारक याची अंमलबजावणी न करता माल उचलेल, त्याच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर येथील लॉरी ऑपरेटर्सच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासूनच याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याचा परिणाम तिन्ही ठिकाणाहून होणाऱ्या वाहतुकीवर होणार आहे. या तीन शहरातून बाहेर जाणारी मालाची वाहतूक मंदावण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने साखरेच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. महापुराच्या काळात रस्ते वाहतूक बंद राहिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमधून साखर बाहेर पडली नाही. आता रस्ते वाहतूक सुरळीत सुरू झाली असताना लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या नव्या नियमाचा फटका साखर वाहतुकीला बसण्याचा धोका आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.