छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीचा पाणी प्रश्न आता पेटला आहे. न्यायालयीन लढाईनंतर आता मराठवाड्यातील सर्व पक्षीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी पाण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेते जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध करीत असल्याने मराठवाड्यातील ऊस पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना नेण्यास नेते व शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. दि.२० रोजी रात्री घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून रास्ता रोको आंदोलन केले.
घनसावंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सध्या जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने मराठवाड्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. असे असताना नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करुन भेदभाव करत आहेत, असा आरोप यावेळी सतीश घाटगे-पाटील यांनी केला.
मराठवाड्यातून १२ लाख मेट्रिक टन ऊस पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी पाण्याला विरोध थांबवला नाही तर ऊस वाहतूक होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. या आंदोलनात अर्जुन भोसले, सुनील भोजने, रामेश्वर गरड, सुदर्शन राऊत, अनिरुद्ध झिंजुर्डे, रुस्तुम बाळकर, बाबासाहेब नवले, अंबादास गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.