सातारा:सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्यावतीने महादेव डोंगर उतारावर कारखान्याचे चेअरमन, आमदार बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कारखान्याचे संस्थापक स्व.पी.डी.पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना मालकीच्या २० एकर क्षेत्रावर झाडे लावून ती उत्तम प्रकारे जोपासल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने प्रथम क्रमांकाचा वनश्री पुरस्कार दिला आहे.वृक्षारोपणासाठी राज्य शासनाकडून कारखान्यास मिळालेल्या महादेव डोंगरावरील ४४ हेक्टर क्षेत्रापैकी १५ हेक्टर क्षेत्रावर गतवर्षी ५००० रोपांची लागण केलेली आहे. वनतळे बांधून ठिबक सिंचन संचाने पाण्याची व्यवस्था करून या रोपांची जोपासना करण्यात आलेली आहे.एक जुलै रोजी ५०० रोपांची लागण करण्यात येणार आहे.तरी या समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.