कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार सुखेंदु शेखर रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ज्युट व्यवसायातील संकटात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या संकटाचा फटका लाखो शेतकरी, कारखाना कर्मचारी आणि अन्य घटकांना बसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कच्च्या ज्युटच्या घसरत्या किमतींवर प्रकाश टाकला आहे. या किमती किमान समर्थन दराच्या (एमएसपी) खाली आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे.
त्यांनी दावा केला आहे की, बी ट्विल बॅगची अपुरी सरकारी खरेदी, साखर उद्योगाकडून जूट पॅकेजिंगच्या अनिवार्य नियमांचे पालन न करणे आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची उदासीनता ही या क्षेत्रातील संकटाची कारणे आहेत. ज्युट क्षेत्रातील विविध भागधारकांना वाचवण्यासाठी मोदींनी या मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करावा, असे आवाहन रे यांनी केले. देशातील अंदाजे ४ कोटी शेतकरी आणि ३.५ लाख ताग गिरणी कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत. यातील बहुतांश पश्चिम बंगालमधील आहेत.
ते म्हणाले, बाजार स्थिर ठेवण्यासाठी, उपजीविका सुरक्षित करण्यासाठी आणि ज्यूट मिल्सची कार्यक्षमता राखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. हजारो ज्यूट मिल कामगार आणि शेतकऱ्यांचे कल्याण तसेच ज्यूट उद्योगाची अखंडता आणि शाश्वतता पंतप्रधानांच्या त्वरित कारवाईवर अवलंबून आहेत असा इशारा रे यांनी पत्रात दिला आहे. इंडियन ज्यूट मिल्स असोसिएशन (IJMA) नेसुद्धा मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या ३२ व्या स्थायी सल्लागार समितीच्या (SAC) बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.