पुणे : साखर कामगारांची वेतनवाढ व सेवाशर्ती कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपुष्टात आली. नवीन वेतनवाढ व सेवाशर्ती करार करण्यासाठी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व राज्य साखर कामगार संघ यांनी संयुक्तपणे ७ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चा काढूनही राज्य शासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व राज्य साखर कामगार संघ, या दोन्ही संघटनांनी १६ डिसेंबरपासून साखर कामगारांच्या बेमुदत संपाचे आयोजन केले. त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री पवार यांनी सहकार विभागाचे सचिव व अधिकारी यांची बैठक घेऊन त्रिपक्षीय समिती गठित केल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सुमारे दोन लाख साखर कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्रिपक्षीय समितीचे सदस्य युवराज रणवरे यांनी ही माहिती दिली आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी रणवरे यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. साखर कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठित केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. दरम्यान, या अशासकीय त्रिपक्षीय समितीमध्ये साखर कामगार प्रतिनिधी सदस्य म्हणून ‘छत्रपती कारखान्यातील कामगारनेते युवराज रणवरे यांची नियुक्ती झाली आहे. रणवरे यांनी सांगितले की, साखर कामगारांची वेतनवाढ व सेवाशर्ती करारासाठी त्रिपक्षीय समिती गठित करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.