नवी दिल्ली / लखनौ : केंद्र सरकारकडून खरेदीच्या गॅरंटीने इथेनॉलला पाठबळ मिळाल्याने उत्तर प्रदेशातील अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनाला सुरुवात केली आहे. राज्यातील अग्रेसर साखर उत्पादक त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीजने धान्यावर आधारित इथेनॉलमध्ये विविधता आणली आहे. आता ही कंपनी उत्तर प्रदेशात आघाडीचा पुरवठादार म्हणून समोर आली आहे.
द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, त्रिवेणीच्या मालकीच्या नारायणपूर प्लांटमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही जुलै २०२२ पासून ३.५ कोटी लिटरपेक्षा अधिक इथेनॉलचे उत्पादन केले. धान्याचा यासाठी फीडस्टॉक म्हणून वापर केला. बी हेवी मोलॅसीस आणि उसाच्या रसापासून उत्पादित इथेनॉल लक्षात घेतले तर एप्रिल २०२२ पासून एकूण ५ कोटी लिटरपर्यंत उत्पादन झाले आहे.
नारायणपूरमध्ये सध्या साखर कारखान्याने एप्रिल २०२२ मध्ये २०० किलो लिटर प्रती दिन (केएलपीडी) क्षमतेने इथेनॉल उत्पादन सुरू केले. कंपनीला पुढील दोन ते तीन महिन्यात इतर युनिटमधूनही उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षा आहे. त्रिवेणी इंजिनीअरिंगने चालू आर्थिक वर्षात १११० केएलपीडी क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे.
प्रसार माध्यमातील रिपोर्टनुसार कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादन ४.५ कोटी लिटरपेक्षा अधिक केले आहे. यामध्ये ३.७ कोटी लिटर नारायणपूर प्लांटमधून तर उर्वरीत ०.८ कोटी लिटर उत्पादन मुजफ्फरनगर प्लांटमधून केले आहे.