मुंबई : ट्रम्पच्या टॅरिफ प्लॅनच्या आधी भारतीय शेअर बाजारात मंगळवारी त्सुनामी पाहायला मिळाली. भारतीय बेंचमार्क निर्देशांक १ एप्रिल रोजी सलग दुसऱ्या सत्रात घसरले. सेन्सेक्स १,३९०.४१ अंकांनी घसरून ७६,०२४.५१ वर बंद झाला, तर निफ्टी ३५३.६५ अंकांनी घसरून २३,१६५.७० वर बंद झाला. एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स या निफ्टीमधील प्रमुख शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. तर इंडसइंड बँक, ट्रेंट, बजाज ऑटो, जिओ फायनान्शियल, एचडीएफसी लाइफ मध्ये वाढ झाली.
सोमवारीही सेन्सेक्स १९१.५१ अंकांनी घसरून ७७,४१४.९२ वर तर निफ्टी ७२.६० अंकांनी घसरून २३,५१९.३५ वर बंद झाला होता. २ एप्रिलपासून लागू होणाऱ्या ट्रम्प टॅरिफमुळे बाजार दबावाखाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाजार तज्ज्ञ अजय बग्गा म्हणाले की, अमेरिका विविध देश आणि क्षेत्रांवर टॅरिफ जाहीर करत असताना आज “टी-डे” जवळ येत असल्याने अनिश्चिततेची झळ भारतीय बाजारपेठांना बसत आहे.
बाजारपेठेतील घसरणीमागील आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे इराण, रशिया आणि व्हेनेझुएलाशी संबधित बातम्यांचा कच्च्या तेलाच्या किमतींवर होणारा परिणाम, जो भारतासारख्या प्रमुख तेल आयातदारासाठी नकारात्मक असू शकतो. थोडक्यात, अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील जोखीम हे आज भारतीय बाजारपेठेत घसरण होण्याचे प्रमुख कारण असल्याचे बग्गा म्हणाले.